.
स्वामींनी कधीही त्यांच्या कारकिर्दीत सोवळे ओवळे याला काहीच महत्व नाही दिले. या रीतीची त्यांना खूप चीड असायची. अडचण (मासिक पाळी) आलेली बाई दर्शनासाठी सर्वांपासून दूर बसलेली दिसली कि स्वामी स्वत: उठून त्या बाई जवळ जाऊन तिला स्वतः च्या हाताने प्रसाद भरवत असत. विटाळशी या स्वामींना राग होता.
स्वामी म्हणायचे,”बाई ही आई आहे आणि आई कधीच विटाळशी होऊच शकत नाही. तुम्ही सगळे हरामखोर आहात. जिने जन्म दिला तिलाच तुम्ही घरा बाहेर बसवता.” याच विषयावर ही स्वामींच्या जीवनातील एक सत्य घटना:स्वामींचा एक कट्टर भक्त चोळप्पा यांनी एकदा त्यांच्या घरी सत्यनारायण पूजेचा संकल्प केला. आणि रिवाज प्रमाणे स्वामींकडे मठात जाऊन या सत्यनारायण पूजेसाठी विनम्रतेने परवानगी मागितली.
यावर स्वामी खुश होऊन म्हणाले,” चोळ्या, पूजा घालतोस हे छान आहे पण प्रसादाचे जेवण मात्र मी आणणार.” चोळप्पा यावर आनंदित होऊन आपल्या घरी परत गेले. घरी आल्यावर कुटुंबाशी चर्चा करून चोळाप्पानी पूजा करण्याचा मुहूर्त पुढील महिन्यातला एका दिवशीचा ठरवला. पूजेची तयारी करण्यात सारे कुटुंब गुंतून गेले.
पूजेचा दिवस उजाडला तशी चोळाप्पाची पत्नी थोडी अस्वस्थ होती त्याचे कारण म्हणजे प्रसादाची काहीच तयारी तिला करायची नव्हती. परंतु स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर काही प्रश्नच नव्हता. पूजेच्या अगदी तेरा दिवस आधी, स्वामींचे अक्कलकोट मधील एक भक्त साळीकर यांचे वडील वारले होते. आणि चोळप्पाच्या पूजेच्या दिवशीच साळीकर यांच्या वडिलांचे तेरावे होते.
साळीकर यांची चिंता हि होती कि स्वामींना तेराव्याचे जेवण करायला कसे बोलवायचे? चोळप्पाच्या घरची पूजा संपली तसे स्वामींनी आपल्या इतर भक्तांना सांगून साळीकर याच्या घरून तेराव्याचे जेवण मागवून घेतले. आणि सत्यनारायण पूजेला स्वामींनी तेराव्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला आणि नंतर सगळे जण गुपचूप जेवले. स्वामीसमोर काही बोलायची कोणाची बिशाद नव्हती.
अशीच आणखी एक गोष्ट :- राधा कसबेकर या एक स्वामींच्या भक्त. त्याना गुरु चरित्र सप्ताह मांडण्याची प्रबळ इच्छा होत होती. मनात विचार आलेल्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासूनच हि पूजा सुरु करावी असे त्यांच्या मनात आले. परंतु दोन अडचणी समोर असल्याने त्या निर्णय घेऊ शकत नव्हत्या. यापकी एक म्हणजे दुसरीच दिवशी अमावास्या होती आणि त्यांची मासिक पा’ळी त्याच आठवड्यात येणार होती.
त्यांना काय करावे काही सुचत नव्हते. म्हणून राधा कसबेकर यांनी यावर स्वामींनाच विचारून निर्णय घेण्याचे ठरवले. तातडीने राधा स्वामींकडे गेली आणि तिने काही विचारायच्या आधीच स्वामी रागाने गरजले,”राधे, ही अडचण आणि अमावस्या हे सगळे तुम्हा लोकांसाठी. आम्हाला याचे काही नाही. आमच्याकडे बघ सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत.
जा आणि गुरुचरित्र वाच आणि वाचण्या आधी माझ्यासाठी पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं कि ते दूध पिऊन टाक. अडचण बीडचन कूछ नहीं… जाओ. “स्वामींनी सांगितल्याप्रमाणे राधा ने रोज गुरु चरित्र वाचले आणि रोज दूध पिले… तिचा गुरुचरित्राचा सप्ताह सुरळीत पार पडला. आणि आश्चर्य हे कि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर राधाची मासिक पा’ळी सुरु झाली.