। नमस्कार ।
पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षांचा मुलगा स्वर्णव गेल्या काही दिवसांपासून हरवला होता. त्याचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. अखेर आठ दिवसांनी त्यांचा चिमुरडा सापडला आहे. ११ जानेवारीला त्याचं बालेवाडीतून अपहरण झालं होतं.
पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती. त्याच्या शोधावेळी अत्यंत गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास ३०० ते साडेतीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले. तो कसा सापडला असा प्रश्न प्रत्येकाला पडणं स्वाभाविक आहे. त्याचीच ही रंजक कहाणी…
काल बुधवारी दुपारी अपहरण झालेल्या या चिमुरड्याला पूनावळे येथे आरोपी व्यक्तीने सोडून दिलं होतं. पोलिसांना त्याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मुलाला ताब्यात घेउन त्याच्या पालकांकडे सुपुर्द केलंय. मुलगा सुखरूप असून त्याला कोणत्याही प्रकारे जखम झाली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.
सुरक्षारक्षक दादाराव जाधव यांच्याजवळ स्वर्णवला सोडण्यात आलं होतं. आरोपीने स्वर्णव ऊर्फ डूग्गू याला त्यांच्याकडे सोपवलं आणि तिथून पळ काढला. दादाराव जाधव यांनी मुलाच्या बॅगवरील नंबरवर फोन करून याबाबतची पोलीसांना माहिती दिली आणि त्यानंतर स्वर्णव आपल्या घरी सुखरुप पोहोचला.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत बोलताना म्हटलंय की, “अपहरण झालेला मुलगा सुखरूप मिळाला आहे, या प्रकरणाचा तपास सुरु आहे, लवकरच आम्ही आरोपीपर्यंतही पोहोचू.” “मागील 8 दिवसापासून आम्ही मुलाचा शोध घेत होतो. पोलिसांची अनेक पथके दिवस रात्र काम करीत होती. आज दुपारी मुलगा पुनावले येथे मिळाला. तो सुखरूप असून त्याला पालकांकडे सुपुर्द केले आहे.” असं पोलिस सहआयुक्त डॉ. रविन्द्र शिसवे यांनी म्हटलंय.